Coronavirus : ‘कोरोना’च्या धास्तीमुळं आमदारांना मुंबईत मिळेना घर, सरकारी खर्चात हॉटेलमध्ये राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचे नियम पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपायोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने मुंबईत आमदारांना कोणी घर भाड्याने तयार नसल्यामुळे ‘कोणी घर देता का घर’ म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. म्हणून आमदारांसाठी आता हॉटेलच्या खोल्या भाड्याने घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे.

याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, मनोरा आमदार निवासाच्या इमारती पाडण्यात आल्या असून, आमदारांना निवासासाठी दर महिना एक लाख रुपये देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. पण कोरोनाने स्थितीत बदल झाला आहे. आमदारांकडे ग्रामीण भागातून येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कुलाबा आणि आजूबाजूच्या परिसरात आमदारांना कोणीही घर देण्यास तयार नाही, अशा तक्रारी आल्याने पुढच्या तीन वर्षांकरता दीडशे आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

मुंबई स्थित असलेल्या आमदारांना हॉटेलच्या खोल्या देणार नाही. मात्र, मुंबईच्या बाहेरुन येणाऱ्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये सोय करण्यात येईल. त्यासाठी आमदारांना निवासासाठीचे एक लाख रुपये देण्यात येणार आहे, तीच रक्कम हॉटेलसाठी खर्च केली जाणार आहे. या रुममध्ये आमदार आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती राहू शकेल. मनोरा आमदार निवासाचे बांधकाम पूर्णत्वास जाण्यासाठी तीन वर्षे लागतील. म्हणून एवढ्या कालावधीसाठी हॉटेलसोबत करार करण्यात येणार आहे.

सर्वांची चाचणी करण्यात येणार

अधिवेशनाच्या निमित्ताने येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानभवनात ८०० कर्मचारी-अधिकारी काम करतात. त्यातील ५०० जणांना अधिवेशनासाठी बोलवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. वैद्यकीय शिक्षक संचालक विभागाचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितल्यानुसार, दोन्ही सभागृहाचे सर्व आमदार, त्यांचे ड्रायव्हर, पीए सर्व मंत्री व मंत्र्यांचे पीए, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी या सर्वांची तपासणी ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान केली जाणार आहे. ज्यांचा चाचणी अहवाल नाकारात्मक येईल त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.