MPSC च्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखांना होणार परीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे शाळा, महाविद्यालय आणि इतर अभ्यसक्रमांच्या परिक्षा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजित असलेल्या परीक्षाही कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर MPSC कडून प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही 13 सप्टेंबर 2020 रोजी होईल. तर महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही 11 ऑक्टोबर 2020 रोजी होईल. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, आज वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असले तरी, कोरोना विषाणूच्या प्रादुर्बावाबाबत शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी विचारात घेऊन एमपीएससीकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल. तसेच यासंदर्भातील माहिती MPSCच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी परीक्षार्थींनी संकेत स्थळावरून नियमितपणे माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.