मुंबई आणि पुणेकरांनी वेळीच काळजी घेतली नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती !

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. दुसरीकडे नागरिक घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. त्यामुळे एआयआयएम संचालकांनी पुणे आणि मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. आता ज्या भागात कोरोनाने मोठा टप्पा गाठला आहे, तिथेच आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांनी काळजी घेतली नाही तर न्यूयॉर्क किंवा वुहानसारखी अवस्था दोन्ही शहरात तयार होईल असे मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे..

मुंबई-पुण्यातले नागरिक अजूनही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोटरणे पाळत नाहीत. त्यांनी या साथीचे गांभीर्य ओळखले नाही. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये सध्या ही स्थिती आली आहे. कालच्या एका दिवसात अमेरिकेत दीड हजार जणांचा बळी गेला. कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत लाखावर पोहोचली आहे. ती स्थिती टाळायची असेल तर आत्ताच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात राहायला हवे असेही त्यांनी सांगितले. पुण्यात एका दिवसात 41 कोरोनारुग्णांची भर पडली असून मुंबईत दिवसभरात 68 रुग्ण वाढले आहेत. मुंबईत 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ कोरोनाग्रस्तांचं प्रमाण गुणाकार पद्धतीने वाढायला सुरुवात झाली आहे. पुण्याचा काही भाग आणि मुंबईचा ठराविक भाग इथे ही वाढ मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. त्यामुळे हे भाग पूर्ण सील करण्यात आले आहेत. या भागातला फैलाव शहरभर पसरू नये म्हणून लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.