Coronavirus : ‘या’ 5 अवयवांना वेळोवेळी ‘स्पर्श’ करणं ठरू शकतं ‘कोरोना’ संक्रमणाचं मोठं कारण, अशी घ्या काळजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना व्हायरसच्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. लोक हळूहळू घराबाहेर पडू लागले आहेत.

रोनासोबत जगत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच वैयक्तिक स्वच्छतेबाबत काही गोष्टी माहित असायला पाहिजेत जेणे करून तुमचे कोरोनापासून संक्रमण होण्यापासून बचाव होईल आणि त्याचा सामना करू शकाल.

नकळतपणे आपण शरीरातील काही भागांना सतत आणि कारण नसताना स्पर्श करत असतो. स्पर्श करणं हे एक प्रकारे आजाराला निमंत्रण दिल्यासारखे आहे. कारण सध्या कोरोनाच्या प्रसारादरम्यान नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आपण बाहेर फिरत असताना आपल्या हाताचा अनेक वस्तूंना स्पर्श होत असतो. आपल्या हाताचा स्पर्श चेहऱ्यांवर होतो आणि आपण एखाद्या विषाणूच्या रोगोला बळी पडतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

ओठ – महिला कित्येक वेळा आपल्या ओठांना स्पर्श करत असतात. काही पुरुषांना देखील अशीच सवय असते. यामुळे ओठांच्या त्वचेचं नुकसान होतं. शिवाय ओठांच्या आकारावही परिणाम होऊ शकतो. तसेच हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातावरील जंतू तोंडात जाण्याची शक्यताही असते.

डोळे – डोळे हा खूप संवेदनशील अवयव आहे. अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. थकवा आल्यानंतर आपण डोळ्यांवरून हात फिरवतो. आशावेळी जर हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातांवरील धुळ किंवा किटाणू डोळ्यात प्रवेश करू शकतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढतो.

नाक – अनेकांना नाकात बोटं घालण्याची सवय असते. नाकामार्फत एखादा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते. तसेच फुफ्फुसांना सुद्धा धोका निर्माण होण्याचा धोका असतो. नाकाला हात लावण्याची सवय तशी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी असते. तरीही गरज नसताना नाकाला स्पर्श केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कान – काही जण बोटांनीच आपले कान साफ करतात. किंवा कानात काडी, चावी असं काहीतरी टाकतात. हे नुकसानकारक ठरू शकतं. बोटांवर जंतू किंवा विषाणू असतील तर ते कानात जाऊन संक्रमण होऊ शकतं. यामुळे काही वेळा सूजही येऊ शकते.

तोंड – जेवल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्न बोटांनी काढण्याची सवय अनेकांना असते. यामुळे देखील हातावरील अनेक विषाणू तोंडात प्रवेश करु शकतात. त्यामुळे ही सवय बदलणे आवश्यक आहे. ब्रश, पाणी किंवा माऊथ वॉशने तोंड स्वच्छ करा.