Coronavirus : दुर्देवी ! ‘कोरोना’मुळं मुंबईत आणखी 2 पोलिसांचा बळी, आतापर्यंत राज्यातील 37 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याप्रमाणे मुंबई पोलीस दलातही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. शुक्रवारी दोघा पोलीस हवालदारांचा मृत्यू झाला. ते दिंडोशी व बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 23 तर राज्यभरातील 37 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याचे 4 जून रोजी स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांच्यावर सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आठवडाभर त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

त्याच प्रमाणे बोरिवली पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेल्या 42 वर्षीच्या पोलीस हवालदाराला बंदोबस्ताच्या ड्युटीवेळी कोरोना बाधितांशी संपर्क झाल्याने लागण झाली. त्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नालासोपारा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचे रात्री निधन झाले.

राज्य पोलीस दलात आतापर्यंत 197 पोलीस अधिकारी आणि 1211 पोलीस कर्मचारी असे एकूण 1408 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अधिकारी व अंमलदार हे मुंबई पोलीस दलातील आहेत. कोरोनाबाधित पोलिसांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत 1233 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी 334 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर पुन्हा परत आले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.