पतीवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असतानाही ‘कोरोना’च्या लढ्यात रणरागिणीची उडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाविरुद्ध आरोग्य यंत्रणेतील अनेकजण कुटुंबापेक्षा रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अशीच एक रणरागिणी नर्स असून ज्यांच्या पतीवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्या कोरोना रुग्णांसाठी झटत आहेत. मेघा सुर्वे असे त्यांचे नाव आहे.

काही दिवसांपुर्वी त्यांच्या पतीवर हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असताना ही कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात सुर्वे कर्तव्य बजावत आहे. दोन्ही मुलांना हाताच्या अंतरावर ठेवत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना त्या सेवा देत आहेत.

सुर्वे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कार्यरत आहेत. 1996 पासून गेल्या 24 वर्ष त्या कॅज्युअल्टी विभागातील रुग्णांना सेवा देत आहेत. कोरोनामुळे शहर संकटात आल्यावरही त्या इथे ही मागे राहिल्या नाहीत. रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणे, अहवालानंतर त्यांच्यावरील उपचार ठरवणे हे सगळी काम सध्या त्याच्यावर सोपविण्यात आली आहेत. कोरोना योद्धा म्हणून त्या कर्तव्य पार पाडत आहेत. हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याने पती गावी आहेत. अशा परिस्थितीतही त्या रुग्णसेवेत कर्तव्य बजावत आहेत. सध्या इथे मुलगा आणि मुलीसोबत त्या राहतात. शहरात कोरोनाने शिरकाव केल्यापासून त्या मुलांसोबत सोशल डिस्टन्स राखून आहेत. मुलगी स्वयंपाक बनवते तर यांचा मुक्काम घराच्या हॉलमध्ये असतो. घरी जातो तेव्हा काळजी घ्यावी लागते. मी सध्या किचनमध्ये प्रवेशच करत नाही. माझा वावर फक्त हॉलमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले.