Coronavirus : देशात 145 जण ‘कोरोना’ बाधित ; ओडिशा, लष्कर आणि बंगालमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील अनेक राज्यात कोरोना विषाणूचे नवी रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे मंगळवारी रात्रीपर्यत देशातील कोरोना विषाणुची लागण झालेल्यांची संख्या १४५ वर जाऊन पोहचली आहे. त्यात २४ परदेशी नागरिक आहेत. एका दिवसात ८ नवी प्रकरणे समोर आली आहेत. ओडिशामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. लष्कर, पाँडेचरी आणि बंगालमध्येही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. देशात सध्या तब्बल ५४ हजार संशयितांवर विलगीकरण कक्षामधून उपचार करण्यात येत आहेत.

लष्करामध्येही संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. इथे एक तरुण स्काऊट कोरोना विषाणू बाधित आढळला. रुग्णाचे वडिल इराणहून परत आले व त्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर कुटुंबियांची तपासणी केली. तेव्हा तरुण मुलालाही त्याची बाधा झाल्याचे समोर आहे. बंगालमध्ये १८ वर्षाचा तरुण, पांडिचेरी मध्ये ६८ वर्षाची महिला कोरोना बाधित झाले आहेत.

देशात सध्या ११३ भारतीयांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील १४ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत ८ रुग्ण असून त्यातील दोन ठीक झाले आहेत. कर्नाटकात ११ रुग्ण असून त्यातील एक जण बरा झाला आहे. केरळ २६ (त्यातील ३ रुग्ण बरे), उत्तर प्रदेश १५ रुग्ण असून त्यातील पाच जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ४० रुग्ण आहेत. त्यात तीन परदेशी नागरिक आहेत. लडाख ६, जम्मू काश्मीर ३, तेलंगणा ५, राजस्थान २ परदेशी नागरिकांसह ४, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब आणि ओडिशा प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याशिवाय हरियाना येथे संक्रमित झालेल्या १५ जणांपैकी १४ जण परदेशी आहेत. उत्तराखंडमध्येही एक रुग्ण आहे.