कधी संपणार ‘कोरोना’चा प्रादुर्भाव ? महामारीच्या 511 तज्ञांनी दिले उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. काही देशांमध्ये प्रकरणे किंचित कमी झाली आहेत, पण काही देशात प्रकरणे वाढण्याचा धोका कायम आहे. अशात ५११ तज्ञांचे एक सर्वेक्षण समोर आले आहे आणि कोरोनाच्या परिणामामुळे आगामी काळात त्यांचे आयुष्य कसे असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या महामारी तज्ञांनी लोकांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली नसून त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगितले आहे.

काही महामारी तज्ञांनी तर आतापासूनच डॉक्टरांना भेटणे आणि लहान गटात सामील होण्यास सुरवात केली आहे. पण बहुतेक महामारी तज्ञांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत लस किंवा उपचार येत नाही तोपर्यंत ते मोठ्या कॉन्सर्ट, क्रीडा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाणार नाहीत. उपचार किंवा लस येण्यास एक वर्ष लागू शकते. बर्‍याच तज्ञांनी सांगितले की, ते कधीही लोकांची गळाभेट घेणार नाहीत आणि हात देखील मिळवणार नाहीत.

कोरोना संकटादरम्यान प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत जगत आहे. प्रत्येकाकडे जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षा वेगवेगळी आहे. तसेच सध्या चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार कसे होत आहेत, हे पाहणे देखील आवश्यक आहे. या गोष्टींच्या आधारे ते निर्णय घेतील, असे तज्ञांनी सांगितले. ६० टक्के तज्ञांनी म्हटले की, फार महत्वाची भेट नसली तरीही ते उन्हाळ्यात डॉक्टरांना भेटायला जातील. २९ टक्के म्हणाले की, अशा परिस्थितीत ते ३ ते १२ महिने वाट पाहतील. ११ टक्के म्हणाले की, ते एक वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहतील.

जवळपासच्या ठिकाणी गाडी चालवणे आणि एका रात्री सुट्टीवर जाण्याबाबत ५६ टक्के तज्ञ म्हणाले की, त्यांना उन्हाळ्यात असे करण्यास आवडेल. २६ टक्के म्हणाले की, ३ ते १२ महिन्यांनंतर असे करतील आणि १८ टक्के एक वर्षानंतर छोट्या सुट्टीवर जातील.

१९ टक्के तज्ञांनी सांगितले की, ते सलूनमध्ये जाऊन केस कापण्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त वेळ वाट पाहतील. तर ३९ टक्के म्हणाले की, ते ३ ते १२ महिने थांबतील. ४१ टक्के लोकांनी उन्हाळ्यातच सलूनमध्ये जाणार असल्याचे म्हटले.

एका छोट्या डिनर पार्टीबद्दल ४६ टक्के तज्ञांनी सांगितले की, ते ३ ते १२ महिन्यानंतर असे करतील. तर ३२ टक्के लोकांनी उन्हाळ्यातच एक छोटी डिनर पार्टी आयोजित करण्याबाबत म्हटले. पण २१ टक्के तज्ञ एक वर्ष थांबण्यासाठी तयार असल्याचे दिसले.

तसेच उन्हाळ्यात केवळ २० टक्के तज्ञांनी हवाई प्रवासात रस दाखवला. ४४ टक्के तज्ञ ३ ते १२ महिन्यानंतर हवाई प्रवास करू इच्छित आहेत, तर ३७ टक्के लोक एक वर्षापेक्षा जास्त काळ थांबण्यास तयार आहेत.