Lockdown : मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली ! PM मोदींनी 14 एप्रिलनंतर आणखी 2 आठवडे ‘लॉकडाऊन’ वाढविण्याचे दिले ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काँन्फर्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढीसाठी आपली सहमती दर्शविली आहे. पीएम मोदी यांनी आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. बैठकीच्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी संभाषण दरम्यान मुख्यमंत्र्यांसमवेत रुमालाचा मास्क घालून चर्चा करीत होते. या चर्चेत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मनोहर लाल, तेलंगणाचे चंद्रशेखर राव, बिहारचे नितीश कुमार आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांनी सूचित केले आहे की, लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवता येईल. पंतप्रधान मोदी देशाला ही माहिती देण्यासाठी संबोधित करू शकतात. याद्वारे शेतकर्‍यांसाठीही मोठी घोषणा केली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी राज्यांना निधी देण्याबाबत काहीही सांगितले नाही.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊन विषयी बोलतांना मी म्हणालो की जीवन असेल तर जग आहे. प्रत्येक नागरिकाचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाउन आणि सामाजिक अंतर खूप महत्वाचे आहे. देशातील बहुतेक लोकांना हे समजले, ते त्यांच्या घरीच राहिले आणि त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. या मंत्रानुसार देशवासीयांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्नही आपण सर्वांनी केला आणि आता भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, समृद्ध आणि निरोगी भारत चांगल्याप्रकारे जगण्यासाठी दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा देशातील प्रत्येक माणूस आपली जबाबदारी म्हणून जीवन आणि जग या दोघांची काळजी घेईल आणि सरकार आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल तेव्हा आपला कोरोनाविरूद्धचा संघर्ष अधिक मजबूत होईल.