Coronavirus : चिनी सैन्याची अमेरिकेला ‘सरळ-सरळ’ धमकी, म्हणाले – ‘आम्ही कोणत्याही युध्दासाठी तयार’

बीजिंग : पोलिसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला अमेरिकेकडून चीनला जबाबदार ठरवण्यात येत आहे. त्यात आता चिनी सैन्य दक्षिण चीन समुद्रात आक्रमकपणे वागत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चीनने केला. त्यामुळे दोन महाशक्तींमध्ये वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीत चीनच्या युद्धनौकांनी दक्षिण चिनी समुद्रात युद्धाचा सराव केला आहे. त्याचवेळी, अमेरिकेने अलास्कामध्ये एफ-३५ लढाऊ विमानांना युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहे. चिनी सैन्याने सांगितलं की, ते अमेरिकेच्या विरुद्ध कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी म्हटलं आहे की, चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनचं सैन्य दक्षिणी चिनी समुद्रात आक्रमक भूमिका घेत असल्याचं निदर्शनात आलं. कोरोना संसर्ग पसरविल्याचा त्यांच्यावरती झालेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि जगात आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरविल्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे, असं एस्पर पेंटागॉन पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही दक्षिण चिनी समुद्रात पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) चा आक्रमक पवित्र नेहमी पाहत आलोय. फिलिपिन्सच्या नौदलाच्या जहाजाला धमकावणे, व्हिएतनामची फिशिंग बोट बुडविणे आणि ऑफशोर ऑईल आणि गॅस संबंधित इतर देशांना धमकावणे, अशा पद्धतीनं चीन वागत असल्याचं आरोप एस्पर यांनी केली.

पुढं बोलताना ते म्हणाले की, जागतिक महामारीमुळे बरेच देश कोरोना संसर्गाशी लढत आहे. त्याच दरम्यान, अमेरिकेचे प्रतिस्पर्धी स्वतःच्या फायद्यासाठी संकटाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच एका प्रश्नाला उत्तरं देताना त्यांनी म्हटलं की, कोरोना संसर्गाबाबत चीन पहिल्या पासूनच पारदर्शक नव्हता. जर चीन अधिक पारदर्शक झाला असता, तर ‘आम्हाला या संसर्गाची तीव्रता समजू शकली असती आणि कदाचित सध्याची परिस्थिती जगाला पाहवयास मिळाली नसती.

दक्षिण चीन समुद्रात चीनचा युद्धसराव

चीनने अमेरिकेसोबत युद्धाची वेळ आल्यास तयारीला वेग दिला आहे. चिनी विमानवाहू जहाजं, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी थेट युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. चिनी सैन्यांनी म्हटलं आहे की, ते अमेरिकेविरुद्धच्या कोणत्याही युद्धसाठी तयार आहे. एवढंच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणाऱ्या विमानांनी दक्षिण चीन समुद्रामध्ये आपली गस्त वाढवली आहे. अमेरिका या भागामध्ये सतत आपले सैन्य जहाज पाठवीत असल्याने चीनने हे पाऊल उचललं आहे.