Coronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीनसाठी जाणार तब्बल 5 लाख शार्क माशांचा बळी !

कॅलिफोर्निया : वृत्त संस्था – कोरोनानं जगभर हाहाकार घातला आहे. यावर अनेक उपाय केले जात आहे. कोरोनावरील लस विकसित करण्याचंही काम सुरू आहे. आता मात्र कोरोनाच्या लशीमुळं शार्क माशांचे प्राण धोक्यात आले आहेत जगभरातील 5 लाख शार्क माशांचा बळी जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील शार्क अलाईज या संस्थेकडून हा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाला अटकाव करणाऱ्या अनेक लशींमध्ये शार्कच्या यकृताच्या तेलाचाही समावेश असल्याचा उल्लेख आहे. लशीची परिणामकता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. शार्कच्या यकृतात स्क्वॅलिन (Squalene) नावाचा पदार्थ आढळतो. हे एक प्रकराचे नैसर्गिक तेल आहे. याचा वापर लशीत होतो. जगभरात जवळपास 30 लशीची मानवी चाचणी सुरू आहे.

शार्क अलाईजच्या संस्थापक स्टेफनी बेंडिल यांनी सांगितलं की, कोणत्याही गोष्टीसाठी प्राणी, मासे यांना मोठ्या प्रमाणावर मारणं योग्य नाही. विशेष करून ज्या जीवांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत नाही त्यांना ठार मारणं चुकीचं आहे. लस विकसित होण्याची प्रक्रिया ही मंद गतीनं व्हावी असं अजिबात नाही. मात्र स्क्वॅलिन (Squalene) च्या समावेशाशिवाय लशीची चाचणी करावी” असंही त्यांनी सांगितलं.

जगभरातील नागरिकांना कोरोना संसर्गाला अटकाव करणाऱ्या लसीच्या 2 डोसची गरज पडली तर 5 लाख शार्कचा बळी जाईल. तर एका डोसची आवश्यकता भासल्यास अडीच लाख शार्क माराव्या लागतील असंही शार्क अलाईज या संस्थेनं म्हटलं आहे.

सध्या सुरू असलेल्या लस चाचणीत स्वयंसेवकांना प्रत्येकी 2 डोस द्यावे लागले आहेत. तर जॉन्सन अँड जॉन्सननं लशीचा एक डोस पुरेसा असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यात 60 हजार जणांवर चाचणी होणार असल्याचं जॉन्सन अँड जॉन्सननं स्पष्ट केलं आहे. ही चाचणी अमेरिका, दक्षिण आप्रिक, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू आदी देशांमध्ये होणार आहे.