Coronavirus : ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेत 70 % लोकांना ‘संसर्ग’ होण्याचा ‘धोका’ !

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येक देशाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसने जवपळपास 3 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 44 लाखापर्यंत संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आहे. कोरोनावर प्रत्येक देश संशोधन करत असून दररोज वेगवगेळी माहिती समोर येत आहे. एका नव्या संशोधनानुसार, कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयावह असणार असून यामध्ये जगातील सुमारे 70 टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेतील मिन्नेसोटा विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इफेकेशियस डिजीस रसर्च अँड पॉलिसी’चे संचालक डॉ. मायकल ऑस्टरहोम यांनी याबाबत इशारा दिला आहे. एका वृत्तानुसार, एका मुलाखतीत त्यांनी जगातील दोन तृतीयांश लोकांना कोरोनाची बाधा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी एक वर्षभरात तरी कोरोनाला प्रतिबंध करेल अशी लस विकसित होईल याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकांमध्ये कोरोनाच्या संसर्गाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होणार नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग फैलावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जगातील 60 ते 70 टक्के नागरीक कोरोनाबाधित होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरु होईल. रोगप्रतिकारक शक्तीमुळे कोरोना संसर्गाचा नवीन वाहन राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.