Coronavirus : मृत्यूपूर्वी ‘या’ तरुणानं आपल्या पत्नीला लिहिलं ‘भावुक’ करणारं पत्र !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याआधी एका 32 वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीला आणि मुलांना एक पत्र लिहिले. या तरुणाच्या मृत्यूनंतर जेव्हा पत्नी त्याचे सामान तपासत होती, तेव्हा तिला मोबाइल फोनमध्ये मृत पतीची चिठ्ठी मिळाली. ही बाब अमेरिकेच्या कनेटिकटमधील डॅनबरी शहरातील आहे. महिनाभर कोरोनाशी झुंज देऊन जॉन कोएल्हो याचे 22 एप्रिल रोजी निधन झाले. गेल्या 20 दिवसांपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

जॉन स्थानिक न्यायालयात काम करत होता. काम करत असताना जॉनला कोरोना संसर्ग झाला. त्याने आपल्या पत्रात पत्नीला तसेच 2 वर्षाचा मुलगा आणि 10 महिन्यांच्या मुलीला संबोधित केले. पत्नी केटी सांगते की जॉनला सुरुवातीला कोरोनाची लक्षणे नव्हती. त्याच वेळी, पत्नी मध्ये आणि मुलीमध्येही सौम्य लक्षणे दिसून आली. शेवटच्या क्षणी पत्नीला त्याच्याकडे जायचे होते, परंतु जेव्हा ती रुग्णालयात पोहोचली, तेव्हा उशीर झाला होता.

मृत्यूच्या आधी जॉनने आपल्या फोनच्या नोट्समध्ये पत्नी आणि मुलांसाठी लिहिले होते – ‘मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो. तुम्ही मला उत्तम आयुष्य दिले. मी खूप भाग्यवान आहे आणि मला अभिमान आहे की मी तुझा पती आहे आणि ब्रेडिन-पेनीचा पिता आहे. केटी, मी ज्यांना भेटलो त्या सर्वांमध्ये तू सर्वात सुंदर आणि काळजी घेणारी व्यक्ती आहेस.’

‘तुम्ही तुमचे यापुढील आयुष्य आनंदाने व त्याच भावनेने जगावे, जसे आपण प्रेमाने जगत आलो. मुलांसाठी सर्वोत्कृष्ट आई म्हणून तुझ्याकडे पाहणे हा माझा एक शानदार अनुभव होता. ब्रेडिनला सांग की तो माझा सर्वात चांगला साथीदार आहे. त्याचा बाप असण्याचा मला अभिमान आहे. पेनेलोपलाही सांग की ती एक राजकन्या आहे. तिला हवे ते साध्य करता येते. मी खूप भाग्यवान आहे. जर तुला कुणी भेटले तर स्वत:ला थांबवू नको, त्याने फक्त तुझ्यावर आणि मुलांवर प्रेम केले पाहिजे. नेहमी आनंदी रहा.’