Coronavirus : खुशखबर ! ‘कोरोना’च्या जुन्या रूग्णाच्या रक्तापासून झाले नव्या पेशंटवर ‘यशस्वी’ उपचार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या भीषण परिस्थिती दरम्यान एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पाच गंभीर रूग्णांवर रक्ताच्या साहाय्याने उपचार करण्यात आला आहे. हे रक्त त्या रुग्णांचे होते ज्यांना यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. चीनमधील रुग्णालयात उपचार करण्याची ही पद्धत अवलंबली गेली होती होती. तीन रुग्णांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले आहे. दोघे अद्याप रूग्णालयात आहेत पण पूर्वीच्या तुलनेत बर्‍याच चांगल्या अवस्थेत आहेत.

या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जुन्या रुग्णांच्या रक्ताने उपचाराची ही पद्धत कोरोनाच्या बऱ्याच रुग्णांना बरे करू शकते. 27 मार्च रोजी चीनच्या शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने उपचारांच्या या पद्धतीचा अहवाल प्रकाशित केला. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, कोरोनाच्या जुन्या रूग्णांच्या रक्ताने उपचार घेतलेले हे पाच रुग्ण 36 ते 73 वर्षांच्या वयोगटातील आहेत.

जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर उपचार करण्याच्या तंत्रास कोव्हॅलेंट प्लाझ्मा म्हणतात. या तंत्राने बरेच आजार बरे झाले आहेत. याद्वारे, जुन्या बरे झालेल्या रूग्णांचे रक्त नवीन रुग्णांच्या रक्तामध्ये टाकून रोग प्रतिकारशक्ती वाढविली जाते. या तंत्रामध्ये रक्ताच्या आत असलेल्या विषाणूशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार केले जातात. या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध लढतात आणि त्यांना संपवतात. शेनझेन थर्ड हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय क्लिनिकल रिसर्च सेंटर देखील आहे.

सुमारे 12 दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपस्थित असलेल्या पाच रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. त्यातील तीन पुरुष आणि दोन महिला होत्या. जुन्या बरे झालेल्या रूग्णांच्या रक्ताने शेनझेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या रूग्णांवर उपचार केले. रुग्णालयाचे उपसंचालक लियू यिंगजिया म्हणाले की आम्ही 30 जानेवारीपासूनच कोरोनाने बरे झालेल्या रूग्णांचा शोध सुरू केला. त्यांचे रक्त घेतले आणि त्यामधील प्लाझ्मा काढून तो साठविला. जेव्हा नवीन रुग्ण आले तेव्हा त्यांना या प्लाझ्माचा डोस देण्यात आला.

लियू यिंगजिया म्हणाले की, आम्हाला आशा आहे की संपूर्ण जग या मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करेल. हे खरोखर फायदेशीर असून हे तंत्र सध्याला विश्वासार्ह ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हेल्थ इमरजेंसी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माइक रियान यांनी चिनी रुग्णालयाचा रक्ताच्या साहाय्याने उपचार करण्याच्या तंत्रास उत्कृष्ट असल्याचे सांगितले असून यावेळी हा एक योग्य निर्णय आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. माइक रियान म्हणाले की कोरोनाला पराभूत करण्याचा यापेक्षा अजून तरी दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. याचा विकास करून आपण रुग्णांना बरे करू शकतो. यामुळे नवीन रूग्णाच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढते आणि विषाणूचा पराभव करण्याची शक्ती देखील वाढते.