इंदूरच्या विकासासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घेतली, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजनांनी सांगितलं

इंदूर : वृत्तसंस्था – भाजपा खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे. इंदूरच्या विकाससाठी मी पक्षीय राजकारण कायम बाजूला ठेवलं अशी माहिती एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिली आहे.

सुमित्रा महाजन म्हणाल्या की, ‘राज्यात भाजपाचं सरकार असताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी भाजपाचं सरकार होतं. आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. मात्र इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत, असं मला कायम वाटायचं. त्यावेळी मी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. इंदूरच्या समस्या आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेते जीतू पटवारी आणि तुलसी सिलावट यांना विनम्रपणे निवेदन द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यामध्ये लक्ष घालतील, असं आश्वासन मी काँग्रेस नेत्यांना द्यायचे. इंदूरच्या विकासासाठी मी अशा प्रकारे काम केलं. इंदूरचा विकास हाच ध्यास असल्यानं पक्षीय राजकारण कायम बाजूला ठेवलं.’

सुमित्रा महाजन यांनी सलग आठवेळा इंदूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट नाकरण्यात आले होते.

Visit : policenama.com