भारतात Covid-19 चा रिकव्हरी रेट वाढून 68.32 टक्क्यांवर तर मृत्युदर घसरून 2.04 % वर : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड – 19 च्या प्रतिबंध, चाचणी, क्वारंटाईन आणि उपचारांसाठी केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी घेतलेल्या केंद्रित आणि प्रभावी प्रयत्नांमुळे या साथीच्या आजारापासून बरे होण्याचे प्रमाण 68.32 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यू दर घसरून 2.04 टक्के झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले की, भारतात दर 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत संक्रमित प्रकरणे 1,496 आहे, तर जगातील सरासरी 2,425 आहे. मंत्रालयाच्या मते, प्रभावी पाळत ठेवणे आणि तपास यंत्रणांच्या सुधारणेमुळे प्रकरणे लवकर पकडण्यात आली आणि गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांना वेळेवर उपचार मिळाला.

मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबिलेली ‘तपासणी, देखरेख आणि उपचार’ या धोरणाची समन्वित अंमलबजावणी केल्याने हे सुनिश्चित झाले की, जागतिक परिस्थितीच्या तुलनेत मृत्यू दर कमी राहिला. मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘यात सातत्याने घसरण होत आहे आणि आतापर्यंत 2.04 टक्के आहे. कोविड -19 पासून मृत्यू दर कमी करण्याच्या लक्ष्यित प्रयत्नांमुळे भारतात दर 10 लाख लोकसंख्येवर मृत्यूची संख्या घसरून 30 पर्यंत खाली आणली आहे तर जागतिक पातळीवर सरासरी 10 लाख लोकसंख्येवर 91 मृत्यू आहेत.

मंत्रालयाने म्हटले की, यूकेमध्ये 10 लाख लोकसंख्येमध्ये 684 लोक मरण पावले आहेत, तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको आणि रशियामध्ये 10 लाख अनुक्रमे 475, 458, 385 आणि 101 मृत्यूची नोंद झाली आहे. मंत्रालयाने म्हटले की, संसर्गाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ब्राझीलमध्ये दर 10 लाख लोकसंख्येवर 13,451 प्रकरणे आली आहेत आणि अमेरिकेत 14,446 प्रकरणे आहेत, जी भारताच्या तुलनेत अनुक्रमे 9 व 10 पट जास्त आहेत. दुसरीकडे कोविड – 19 वर मात करणाऱ्यांचाही दर झपाट्याने वाढला आहे. गेल्या 24 तासांत 48,900 रूग्ण बरे झाल्याने भारतातील कोविड – 19 तून बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 14,27,005 झाली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो 68.32 टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सध्या 6,19,088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, जे आजपर्यंतच्या एकूण संक्रमित प्रकरणांपैकी 29.64 टक्के आहेत. हे रुग्ण एकतर रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत किंवा घरी क्वारंटाईन आहेत. मंत्रालयाने सांगितले की, देशभरातील चाचण्यांसाठी प्रयोगशाळांमध्ये आणि केंद्राचे नेटवर्क विस्तारल्यामुळे भारताने आतापर्यंत 2,33,87,171 नमुन्यांची चाचणी केली आहे. शुक्रवारी 5,98,778 प्रकरणांची चाचणी केली गेली. मंत्रालयाने म्हटले आहे की, दर दहा लाख लोकसंख्येच्या तपासातही वेगाने वाढ झाली असून आज ती 16,947 आहे.

चाचणीसाठी प्रयोगशाळांमध्ये होणारी वाढ ही मोठ्या प्रमाणावर तपासणीचे प्रमुख कारण आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची सध्या भारतातील 1396 प्रयोगशाळांमध्ये यात 936 सरकारी आणि 460 खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आज 61,537 नवीन प्रकरणे समोर आल्याने रुग्णांची संख्या वाढून 20,88,611 झाली आहे. तर 933 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढून 42,518 झाला आहे.