Coronavirus : धक्कादायक ! SRPF चे 2 जवान ड्युटी सोडून आले पळून, निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

जालना : पोलीनामा ऑनलाइन – जालन्यात सहा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेले राज्य राखीव दलाचे ते दोन्ही जवान मालेगाव बंदोबस्तावरून पळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस जवान हे अतिशय धाडसीपणे, कोरोनाविरुद्ध आघाडीवर लढत आहे मात्र या जवानांच्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
जलना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पाचपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 मधील जवान होते. हे जवान मालेगाव येथून बंदोबस्तावरून परतले होते. त्यापैकी 2 जवान हे मालेगाव येथे बंदोबस्त ड्युटीवरून कोणालाही न सांगता पळून परस्पर जालन्यात परतल्याचे समोर आले.

याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादिवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या जवानांनी केलेले कृत्य हे धक्कादायक असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा माहिती काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.