IPL : आठही फ्रेंचाइजींनी सर्व खेळाडूंना जाहीर केली सुट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे 13 वे सत्र रद्द होण्याच्या मार्गावर आहे. बीसीसीआयने आधीच 29 मार्चचा प्रस्तावित हंगाम 15 एप्रिलपर्यंत तहकूब केला आहे. आता सोमवारी आठ फ्रेंचायझींमधील महत्त्वाच्या बैठकीतही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकाही कोरोनामुळे रद्द झाली आहे. आता आठ फ्रँचायझींनी आयपीएलच्या आगामी हंगामाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.

पुढील ऑर्डर पर्यंत प्री टूर्नामेंट कॅम्प रद्द :
वास्तविक, फ्रँचायझींनी त्यांच्या सर्व खेळाडूंना सुट्टी दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत फ्रँचायझींनी प्री-टूर्नामेंट शिबिरे रद्द केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 21 मार्चपासून सुरू होणारा आपला कॅम्प रद्द केला आहे. गतविजेते आणि आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स, तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स यांनीही हा निर्णय घेतला आहे.

तीन राज्य सरकारांनी आयपीएल होस्ट करण्यास नकार दिला होता.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, आरोग्याच्या कारणास्तव आरसीबीचे प्रशिक्षण शिबिर रद्द केले जात आहे. आम्ही सर्वांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून सुरक्षित रहावे असे आवाहन करतो. गेल्या आठवड्यात बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली होते. तीन राज्य सरकारांनीही त्यांच्या जागी आयपीएल सामना आयोजित करण्यास नकार दिला.

कोरोना विषाणूमुळे सहा हजाराहून अधिक मृत्यू :
कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 6 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास दीड लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज कॅम्प रद्द झाल्यानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही चेन्नईहून रवाना झाला आहे. आयपीएलच्या माध्यमातून मोठ्या कालावधीनंतर मैदानात पाऊल ठेवणारा धोनीची जोरात तयारी सुरू होती आणि त्याने सराव सामन्यात शतकही केले होते. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार या वेळी आयपीएल अत्यंत कठीण दिसत आहे. कारण कोरोना विषाणू लवकरच नियंत्रणाखाली आला नाही तर पुढच्या महिन्यांत आयपीएल आयोजित करण्यासाठी विंडो मिळवणे सोपे नाही.