पुणे वेधशाळेच्या डिजिटल फलक खरेदीत घोटाळा ! CBI कडून शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकाऱ्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे वेधशाळेच्या डिजिटल फलक खरेदीमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी आणि मुंबईतली एका खासगी कंपनीच्या संचालकांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या डिजिटल फलक खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सीबीआयने संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

वेधशाळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग, तात्कालिन तांत्रिक अधिकारी विपिन माळी तसेच मुंबई येथील व्हिडीओ वॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल गिरकर, मनीषा गिरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे.

काय आहे प्रकरण ?

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून हवेची गुणवत्ता तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणारे डिजिटल फलक शहरातील 12 ठिकाणी काही दिवसांपूर्वी बसवण्यात आले होते. मुंबईतील व्हिडीओ वॉल इंडिया प्रा. लि. कंपनीला हे डिजिटल फलक बनवण्याचं काम देण्यात आलं आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च अर्थात ‘सफर’ या योजनेंतर्गत शहरात 12 ठिकाणी डिजिटल फलक बसवण्यात आले होते. फलक बसवण्याच्या कंत्राटामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.