पुणे : पत्नीचा खुन करणार्‍या पतीला जन्मठेपेची शिक्षा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा गळा दाबून खुन करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश नावंदर यांनी हा निकाल दिला आहे. तातोबा पांडुरंग गरदाडे (रा. दळवीनगर, बी. टी.कवडे रोड) अशी शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना ११ एप्रिल २०१७ रोजी घडली होती. मनिषा तातोबा गरदाडे (वय ३६) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे.

याप्रकरणी मनिषाची बहिण सुनिता सत्यवान बेरगळ यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

तातोबा गरदाडे हा मनिषा हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्याशी भांडण करत असे. ११ एप्रिल २०१७ रोजी त्याने मनिषाशी याच विषयावरुन वाद घातला. रागाच्या भरात तिला मारहाण करुन गळा दाबून तिचा खुन केला. मुंढवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तातोबा गरदाडे याला अटक केली होती.

तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. जे. जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी या गुन्ह्याचा तपास केला. परिस्थितीजन्य पुरावा व इतर महत्वाचे साक्षीपुरावे गोळा करुन आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नावंदर यांच्या न्यायालयात झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी पैरवी अधिकारी बी. एस. शिंदे, हवालदार एस एन नाईक, जी.एस. भापकर यांच्या सहाय्याने खटल्यातील साक्षीदार, पंच यांना न्यायालयात वेळोवेळी हजर करुन सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रशिक्षित करुन न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यास उत्तम कामगिरी केली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने तातोबा गरदाडे याला आजन्म कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.