‘मी छोटा राजनचा माणूस आहे, ३० लाख रुपये दे नाहीतर गेम करेन’; व्यवसायिकाला धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याचे काम करणाऱ्या व्यवसायिकाकडे ३० लाखाची खंडणी मागून नाही दिल्यास ‘मी छोटा राजनचा माणूस आहे. आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुझी गेम करू’ अशी धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये उर्से गावच्या पोलीस पाटलाचा समावेश आहे. सुलतान महाभूत मुलाणी (44), गुलाब बबन धामणकर (41), सतीश लक्ष्मण कारके (29) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

यांच्यासह पोलीस पाटील गुलाब छबुराव आंबेकर, सुनील बाबुराव आंबेकर (सर्व रा. उर्से ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुलदीप ज्ञानोबा धामणकर (26, रा. उर्से, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप हे व्यावसायिक आहेत. ते 10 फेब्रुवारी रोजी दुपारी उर्से गावाच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पुलावर काम करत होते. त्यावेळी सर्व आरोपी तिथे आले. त्यांनी ‘तू काम कसे काय करतोस, तुझ्याकडे आम्ही पाहून घेतो. तुला काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील’ अशी कुलदीप यांना धमकी दिली. त्यावर कुलदीप यांनी ‘मी सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत. मी तुम्हाला पैसे देणार नाही’ असे सांगितले.

त्यानंतर आरोपींनी पुलाच्या शेजारी बाळू बजाबा धामणकर यांच्या टपरीच्या समोरील जमिनीत गाडलेली इलेक्ट्रिक लाईनची केबल ट्रॅक्टरच्या सहाय्याने उकरुन काढली. कुलदीप यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ‘तू आम्हाला पाच लाख रुपये दे आणि गावासाठी 25 लाख रुपये दे’ म्हणत एकूण 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपी सतीश कारके याने ‘मी छोटा राजनचा माणूस आहे. आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुझी गेम करू’ अशी कुलदीप यांना धमकी दिली. तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

You might also like