WB : TMC कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या, BJP ने फेटाळला आरोप

कोलकाता : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची पश्चिम बंगालमधील हावडा येथे मंगळवारी (दि. 29) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पक्षाच्या युवा संघटनांनी जोरदार निदर्शने केली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाराच्या घटना घडल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला असून भाजपने मात्र तो फेटाळून लावला आहे.

धर्मेंद्र सिंह असे हत्या झालेल्या टीएमसी कार्यकर्त्याचे नाव आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ता नुसार, धमेंद्र सिंह आपल्या घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात जखमी झाल्यानंतर सिंह याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. घटनेनंतर टीमएसीच्या कार्यकर्त्यांनी हावडा येथील बॉटेनिकल गार्डन परिसरात संताप व्यक्त करण्यासाठी जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले.

हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. मृत व्यक्ती आणि हल्लेखोर रियल इस्टेटच्या व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती समोर येत असून पोलिस यासंदर्भातील तपास करत आहेत.