डिक्कीतील ऐवज चोरून तो बनला लखपती, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील पार्क केलेल्या मोपेडच्या डिक्कीतून पैसे आणि मौल्यवान वस्तू लंपास करून लखपती झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या यनीट ४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याने शहरातील १२ ठिकाणी मोपेडमधून चोरलेल्या ऐवज विकून आलेला पैसा बँकेत साठवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून ४ लाख २७ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सुभाष उर्फ बाबा लक्ष्मण बनपट्टे (वडारवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याने जामीनावर सुटल्यानंतर हे गुन्हे केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मागील काही दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या अक्टिवा, अक्सेस, ज्यूपीटर या मोपेड गाड्यांच्या डिक्कीतून रोख रक्कम आणि मोल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तीन आठवड्यापुर्वी नाना पेठ परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमधून अक्टिवा गाडीची डिक्की उचक़टून रोकड लंपास करण्यात आली होती. त्यानंतर केलेल्या तपासा पोलीस नाईक रमेश चौधर, निलेश शिवतरे यांना माहिती मिळाली की ही चोरी रेकॉर्डववरील गुन्हेगार बाबा बनपट्टे याने केली असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो या गुन्ह्यांमधून जामीनावर सुटला आहे. त्याने जामीनावर सुटल्यानंतर शहरात अशा प्रकारे मोपेड गाड्यांच्या डिक्की उचकटून १२ गुन्हे केले आहेत. तो चोरी केल्यानंतर काही रक्कम खर्च करून उर्वरित रक्कम बॅंकेत ठेवत होता. त्याच्याकडून बॅंकेत ठेवलेले ४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर एक २० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व रोख ७ हजार रुपये जप्त केले आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलीस निरीक्षक आश्वीनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी रमेश चौधर, निलेश शिवतरे, अतूल मेंगे, सचिन ढवळे, भालचंद्र बोरकर, रमेश साबळे, शंकर पाटील, शंकर संपते, गणेश साळुंके, दत्तात्रय फुलसुंदर, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.