बील आहे की चेष्टा ? बिलाचा आकडा पाहून बटालियन कॅम्पच्या जवानांना बसला जोरदार ‘शॉक’

ADV

श्रीनगर : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ बिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला आहे. विज बिलामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही वीज कंपन्यांनी मोठा शॉक दिला आहे. वीज कंपन्यांच्या या मनमानी कारभारामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता तर जवानांच्या बटालियनलादेखील वीज कंपन्यांनी शॉक दिला आहे.

काश्मीर खोऱ्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियन कॅम्पला तब्बल दीड कोटींचे वीज बिल देण्यात आलं आहे. चरारे-शेरिफमध्ये असलेल्या सीआरपीएफच्या 181 बाटालियनला ऊर्जा विकास विभागानं (पीडीडी) दीड कोटी रुपयांचं बिल पाठवलं आहे. या बिलावर 181 बाटलियन, सीआरपीएफ असा उल्लेख केला आहे. जम्मू- काश्मीरच्या पोलीस दलाकडून सीआरपीएफचं बिल भरले जाते. मात्र, भरमसाठ बिल पाठवण्यात आल्याने सीआरपीएफच्या तळावरील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ADV

सीआरपीएफचे एडीजी झुल्फीकार हुसेन यांनी सांगितले की, बहुधा बिलात एखादी चूक झाली असावी. आम्ही त्याबद्दल पीडीडीला संपर्क केला. पण शनिवार, रविवार असल्याने त्यांना सुट्टी होती. सीआरपीएफला पाठवण्यात आलेल्या बिलावर 10 ऑगस्ट ही तारीख आहे. 27 ऑगस्टपर्यंत बिल भरण्याची शेवटची तारिख आहे. तोपर्यंत पीडीड बिलात झालेला घोळ मिटलवेल अशी अपेक्षा हुसेन यांनी व्यक्त केली आहे.