पुण्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत संजय राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना गौप्यस्फोट केला आहे. पुण्यात अधिक लक्ष द्यायला हवं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुरुवातीपासूनच सांगणं होतं. तिथ घाईघाईनं लॉकडाऊन उठवण्यात आलं, त्यासही मुख्यमंत्र्यांचा विरोध होता, असे संजय राऊत म्हणाले.

पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचे काल निधन झाले. त्यांना वेळेवर कार्डिअॅक अँब्युलन्स न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोनाच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला टार्गेट केलं आहे. याबाबत संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली याठिकाणी उभारण्यात आलेली कोविड सेंटर व्यवस्थित सुरु आहेत. यामध्ये काही त्रुटी असू शकतात. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध होण्यापुर्वीच ते सुरु करण्यात आलं होतं, असं आता समोर आलं आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीला सरकारला दोष देण्याची पद्धत चुकीची असल्याचे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, रायकर यांना मी व्यक्तिश: ओळखत होतो. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली गेली अशी माझी माहिती आहे. दुर्दैवानं त्यांना अँब्युलन्स मिळायला उशीर झाला. पुण्यासारख्या शहरात हे होणं बरोबर नाही, सरकारनं यापुढे याची काळजी घेतली पाहिजे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, पुण्यात आता कोरोनाशी लढण्याचा मुंबई पॅटर्न राबवला जात आहे. काही अडचणी असतील तर त्या दूर करून जनतेला उत्तम सुविधा मिळतील याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. केवळ राज्य सरकार आणि महापालिकेचीच नाही. विरोधकांची देखील आहे. शेवटी जनता आणि शहर हे सर्वांचं आहे, असं राऊत म्हणाले.