मुंबईत जमावबंदीची मुदत 30 सप्टेंबपर्यंत वाढवली

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे साखळी तोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदीची मुदत 30 सप्टेंबपर्यंत वाढवली आहे. अत्यावश्यक सेवा आणि टाळेबंदी शिथिल करताना शासनाने मुभा दिलेल्या व्यक्ती, सेवा, व्यवसायांना सूट असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदेशामुळे संचारबंदी जारी होणार, असा गैरसमज पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्यासह मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून या आदेशान्वये नवी बंधने लादण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांनी 31 ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत 30 सप्टेंबपर्यंत वाढविली आहे. आधीच्या आणि आताच्या आदेशांमध्ये काही बदल नाहीत, नवे र्निबध नाहीत, असे स्पष्ट केले. अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय आणीबाणीसह अत्यावश्यक सेवा आणि शासनाची परवानगी असलेल्या व्यक्तींना संचारबंदीचे नियम लागू नसतील. शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल केले. या प्रत्येक टप्प्यात ठराविक सेवा, व्यवसायांना मर्यादीत प्रमाणात मुभा दिली. शासनाने मुभा दिलेल्या सेवा, व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती पुर्वीप्रमाणेच प्रवास करू शकतील, असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.