केडगाव-चौफुला रोडवर असणाऱ्या हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट, 2 जण जखमी

दौंड – पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला रोडवर असणाऱ्या हॉटेल बिर्याणी दरबार या हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन दोन जण जबर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरीपार्धी गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बिर्याणी दरबार या हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी दिड वाजता गॅसचा स्फोट झाला.

Blast

जखमींमध्ये या हॉटेलचा आचारी छोटू खान आणि पिंपळगाव येथील शहाबुद्दीन सय्यद हे जखमी झाले. स्फोटाचा भीषण आवाज ऐकून शेजारी असणाऱ्या नागरिकांनी जखमींना हॉटेलमधून बाहेर काढून रुग्णालयात भरती केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला सिलेंडर मधील नळीला आग लागली. ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच हा स्फोट झाला. यामध्ये वरील दोनजण जखमी झाले. सुदैवाने याच ठिकाणी ५ ते ६ जण हजर होते, परंतु ते वेळीच तेथून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. यातील शहाबुद्दीन सयद हे ज्येष्ठ नागरिक झालेला प्रकार पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते. परंतु स्फोट झाल्यानंतर त्यांना पळता न आल्याने ते जखमी झाले.

Daund

जखमींना केडगाव मधील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले असून दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या हॉटेल मधील फायबर टेबल, हवेचा पंखा व इतर वस्तूचे अक्षरशः तुकडे झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे व बाळासो चोरमले, विशाल जाधव यांना पाठवून घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/