वाळू उपसा करणाऱ्या ७ बोटींवर दौंडमध्ये कारवाई, ५ बोटी स्फोटके लावून फोडल्या

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये होत असलेला बेसुमार वाळू उपसा रोखण्यासाठी आज पोलीस आणि महसूल पथकाने धाड टाकून वाळू उपसा करणाऱ्या सुमारे ७ बोटी ताब्यात घेऊन त्यातील ५ बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवून दिल्या आहेत. यामुळे वाळू माफियांना मोठा हादरा बसला असून दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करणे बाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सूचना दिल्यानंतर आज दि. २१ सप्टेंबर रोजी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे काही वाळू माफिया दौंड तालुक्यातील हिंगणी बेरडी परिसरामध्ये भीमा नदीच्या पात्रात पाण्यामध्ये यांत्रिक बोटी उतरवून त्याच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून वाळूची चोरी व विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या महिती आधारे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी आपल्या पथकास सदर परिसरात छापा घालून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. यावेळी सदर पथकाने हिंगणी बेरडी येथील भीमा नदी पात्रात छापा घातला असता आरोपींनी  बोटी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस पथकाने दुसऱ्या यांत्रिक बोटीने पाठलाग करून या ठिकाणावरून एकूण ७ यांत्रिक बोटी हस्तगत केल्या यावेळी वाळू चोरणारे काही इसम मिळून आले तर काही पळून गेले. पोलीस व महसूल पथकाने घटनास्थळीच ५ लोखंडी यांत्रिक बोटी जिलेटीनचे साहाय्याने उध्वस्थ केल्या.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,  उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सपोनि सुहास पोरे,  पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, स्वप्नील जावळे तसेच महसूल विभागाचे  नितीन मागतेकर, मंडल अधिकारी, तलाठी विनोद बोकडे, सचिन जगताप, रोहित गवते, संतोष इंडोले यांनी केली.

Visit :- policenama.com