IPL 2021 : दिल्लीकडून पराभवानंतर रोहित शर्माला आणखी एक झटका

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सलग पाच सामन्यात दिल्लीला धुळ चारणार्‍या मुंबई इंडियन्सला मंगळवारी दिल्ली कॅपिटलने चारी मुंड्या चित केले. या पराभवाच्या धक्क्यानंतर आयपीएल कमिटीने रोहित शर्माला आणखी एक झटका दिला आहे. र्निधारित वेळेत २० षटके पूर्ण न केल्याने रोहित शर्मा याला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.

आयपीएलच्या या सीझनमध्ये मुंबईने अशा प्रकार पहिल्यांदा चुक केली असून त्यामुळे त्यांना आयपीएल कोड आॅफ कंडक्टअंतर्गत दंड भरावा लागणार आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक संघाला ९० मिनिटांत २० ओव्हर पूर्ण करणे अपेक्षित आहे. याशिवाय या ९० मिनिटात संघाला अडीच मिनिटांचा दोन टाईम आऊटही मिळणार आहे.

म्हणजे प्रत्येक संघाला ८५ मिनिटात एकूण २० ओव्हर टाकणे अपेक्षित आहे. जर या नियमाचे उल्लंघन झाल्यास पहिल्यांदा नियमभंग झाल्यावर १२ लाख रुपयांचा दंड आणि दुसरी चुक केली तर कॅप्टनला २४ लाखांचा दंड आणि तिसरी चुक केली तर कॅप्टनवर एका मॅचची बंदी असा नियम आहे. त्यानुसार रोहित शर्माची ही पहिलीच चुक असल्याने त्याला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.