पाचवीचा वर्ग जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती : शिक्षणमंत्र्याची घोषणा

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शिक्षण विभागाला जोडण्याच्या अनुषंगाने काढण्यात आलेला निर्णय तूर्त मागे घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही, पुरेशा वर्गखोल्या नाहीत अशा स्थितीमध्ये हा निर्णय राबविणे हिताचे ठरणार नाही, अशी भूमिका आमदार विक्रम काळे यांनी मांडली होती. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान पाचवीचा वर्ग जोडण्याच्या निर्णयास स्थगिती देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. जालना येथे शालेय शिक्षणाबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शिक्षणाधिकार्‍यांकडून 300 वर्ग खोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्गात बसण्यास जागा नाही. नव्याने पाचवीचे वर्ग जोडण्याच्या निर्णयामुळे मुख्याध्यापकांच्या पदाचे प्रश्न निर्माण होतील. त्याचा परिणाम शाळा व्यवस्थापनावर होईल. शिक्षक हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून घेण्यात आलेला हा निर्णय आताच कशासाठी, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. 2009 पासून अंमलबजावणी सुरू होती तर आताच कशासाठी वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी विचारणा करण्यात आली. वर्ग जोडण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर हा निर्णय मागे घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.