तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसाने अकोले तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावी. अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

आज दुपारी शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, परतीच्या पावसाने अकोले तालुक्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, बाजरी, मका, ऊस, घास, कांदे, डाळींब, भात अशा अनेक पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोडांशी आलेला घास हिरावला आहे. राज्यपाल महोदयांनी हेक्टरी ८००० रूपये नुकसान भरपाई जाहिर केली आहे. हि भरपाई अत्यंत तोकडी असुन यापेक्षा शेतकऱ्यांना बियाणे व इतर लागणारा खर्च जास्त झालेला आहे. त्यामुळे हि शेतकऱ्यांची चेष्टा करणारी बाब आहे. तरी भरपाईत वाढ करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० रुपये भरपाई मिळावी व अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी अकोले तालुका, शहर शिवसेना व युवासेनेच्यावतीने करत असल्याचे म्हटले आहे .

यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, उपजिल्हा प्रमुख रामहारी तिकांडे, शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी, पं. स. सदस्य संत नामदेव आंबरे, प्रदीप हासे, डॉ.मनोज मोरे, गणेश कानवडे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, आप्पा आवारी, बाळासाहेब देशमुख, विजय पोपेरे, माधव तिटमे, मनोज मोरे, विनायक वाकचौरे, रावसाहेब वाकचाैरे, युवा सेना तालुकाध्यक्ष महेश देशमुख, शहराध्यक्ष महेश हासे, विजय गरुड आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Visit : Policenama.com