Ajit Pawar : ‘कोणत्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा केला याची माहिती जाहीर करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकार कोरोना काळामध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. तसेच राज्य सरकार 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याचवेळी केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आम्ही ऑक्सिजनची निर्मिती जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु केंद्र सरकारने देखील ज्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. त्याची माहिती जाहीर करावी. तसेच ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, त्या राज्यांना अधिक क्षमतेने ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले

10 कोटींपर्यंत लस उत्पादनाचे नियोजन

पुण्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा अजित पवार घेतला. यामध्ये लसीकरण मुद्यावर अजित पवार यांनी जोर दिला. देशात सर्व नागरिकांना लस मिळणे आवश्यक आहे. लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे दिसून आले आहे. मात्र लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे. दहा कोटीपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तहान लागल्यावर विहीर न खोदता…

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात देखील तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. ऑक्सिजनची क्षमता 1200 मेट्रिक टनाची तयारी आता 1800 ने वाढवली आहे. प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी सुरु केली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.