खासदारकीची इच्छा नाही, फक्त दानवेंना पाडायचे हे नक्की : ‘या’ आमदाराचा निर्धार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मी केली होती. खासदार व्हायचे हा त्यामागचा हेतून नाही, तर शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंना धडा शिकवून पराभव करायचे ही भूमिका आहे. त्यावर मी आजही ठाम आहे. स्वतंत्र निवडणूक लढवावी, की कॉंग्रेसच्या उमेदवाराला दानवेंच्या विरोधात पाठिंबा द्यावा याचा विचार करतोय अशा शब्दात अचलपूरचे आमदार तथा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आपला दानवेंना विरोध कायम असल्याचे म्हटले आहे.

“इतकी तूर खरेदी केली, तरी रडतात साले’ असे वादग्रस्त विधान केल्यानंतर रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी गेल्यावर्षी केली होती. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंना पराभूत करण्याचा चंग बांधत बच्चू कडू यांनी थेट भोकरदनमध्ये जाऊन मेळावे आणि कार्यक्रमही घेतले.

रावसाहेब दानवेंच्या विरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केलेल्या आमदार बच्चू कडू यांची भूमिका काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रावसाहेब दानवेंना पराभूत करणे हा माझा एकमेव हेतू आहे. त्यांच्या विरोधात लढण्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरण, दानवे यांची आर्थिक ताकद, अर्जुन खोतकरांनी त्यांना दिलेले आव्हान या सगळ्या गोष्टींवर आपले लक्ष असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.

जालन्यात मी आणि खोतकर अशा दोंघानी लढणे म्हणजे दानवेंचा मार्ग सोपा करणे ठरले हे ओळखून दोंघापैकी एकानेच निवडणूक लढवायची अशी चर्चा आमच्यामध्ये झाली होती. अर्जुन खोतकरांनी निवडणूक लढवली तर त्यांना पाठिंबा देण्याची माझी भूमिका आहे. परंतु आता परिस्थीती बदलली आहे. खोतकर दानवेंविरोधात निवडणूक लढवतील की नाही ? हे स्पष्टपणे सांगता येत नाही. अशावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कुणाला उमेदवारी देते हे पाहून पुढील निर्णय घेण्याचे मी ठरवले असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

तुमच्या पवार साहेबांनी ‘यांना’ कळा सोसून जन्माला घातले का ? ; ‘या’ नेत्याचे वक्तव्य
सुजय विखे Is in trending पण…