हॅलो, मी HM अमित शहांचा PA बोलतोय, मंत्र्यांना केले फोन अन्..

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तोतया स्वीय सहायकाला (पीए) दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संदीप चौधरी असं त्याचे नाव असून त्याला अलवर येथून अटक करण्यात आली आहे. अमित शहा यांचा पीए असल्याचे सांगत त्याने मंत्र्यांना फोन केले. संदीप याने राजस्थानचे कायदा मंत्री आणि हरयाणाचे कामगार मंत्री यांना फोनवरून आदेश दिले. त्याने सांगितले एका व्यक्तीला नोकरीवर पुन्हा नियुक्त करा, असे आदेश त्याने फोनवरून दिले होते.

सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी संदीप याने स्वत:च्या नोकरीची शिफारस केली होती. त्याला लॉकडाऊनमध्ये कामावरून कमी करण्यात आले होते. तो एका प्रसिद्ध कंपनीत नोकरी करत होता. त्याने फोन केल्यानंतर राजस्थानच्या कायदा मंत्र्यांच्या कार्यालयातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात संदीप चौधरी बाबत चौकशी करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी या नावाचा कोणीच काम करत नाही किंवा येथून कुणीही अशा प्रकारचा फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. अमित शहा यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.

ADV

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अलवरजवळून आरोपी संदीप चौधरीला अटक केली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या मंत्र्यांच्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे फोन त्याने कुणा कुणाला केले होते, याबाबत तपास करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या माध्यमातून हरयाणा किंवा राजस्थानच्या एमआयडीसी क्षेत्रातील एखाद्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी संदीप याचा प्रयत्न होता. त्याच्याकडून फोन आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याने ज्या क्रमांकावरून फोन केला होता, ते सीमकार्ड त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावर आहे.