Coronavirus : दिल्ली पोलीस शिपायाचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाकडे मागितली मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना योद्धे कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु कोरोनाच्या जाळ्यात सापडलेल्या या योध्यांना रुग्णालयाकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. दिल्ली पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. हा पोलीस शिपाई टिळक विहार पोलीस चौकीत कार्यरत असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंगळवारी त्याने एक व्हिडिओ व्हायरल करून चौधरी ब्रह्मप्रकाश आयुर्वेदिक चरक संस्थेच्या रुग्णालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये पोलीस शिपाई स्वत:साठी आणि कुटुंबासाठी मदत मागताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये शिपायाने सांगितले की, तो टिळक विहार पौलीस चौकीत तैनात आहे. 17 एप्रिल रोजी जेव्हा त्याची कोरोनाची टेस्ट झाली तेव्हा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे कळताच शिपायाला चरक संस्थान नजफगडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याने सांगितले की, इथल्या हॉलमध्ये 20 रुग्णांना ठेवले आहेत. त्यांना वापरण्यासाठी एक स्नानगृह आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर दिले जात नाही. रुग्णांना देण्यात आलेले सर्व बेड अस्वच्छ, जे वारंवार सांगून देखील बदलले जात नाहीत. ज्या रुग्णांना ताप आणि सर्दी आहे त्यांना मागणीनुसार औषधही दिली जात नाहीत.

पोलीस शिपायाने व्हिडिओत सांगितले की, प्रशासनाकडे पत्नी आणि मुलाची काळजी घ्या व त्यांची चाचणी करुन घ्यावी अशी विनंती प्रशासनाला केली होती. पण प्रशासनाने माझे ऐकले नाही. तसेच आपल्यावर खासगी रुग्णालयात उपचार करावेत अशी विनंती देखील त्यांने केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रशासनाला जाग
कोरोनाबाधित पोलीस शिपायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरणाने जोर पकडला. यानंतर पोलीस-प्रशासन जागे झाले. पोलिसांनी सायंकाळी उशिरा पत्रक प्रसिद्ध केले. त्यात म्हटले की, शिपायाची पत्नी आणि दोन मुले किरारी येथे राहतात. त्याला एक साडेचार वर्षाचा तर दुसरा अडीच वर्षाचा मुलगा आहे. दोघांनाही थोडासा खोकला आहे. त्यांना देखील कोरनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांची देखील कोरोना टेस्ट घेतली जाईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या प्रकरणावर पश्चिम जिल्हा पोलीस उपायुक्त दीपक पुरोहित यांनी सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नोडल अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की रुग्णालयात पूर्ण व्यवस्था करण्यात येईल. वरिष्ठ पोलीस अधिकारीही मंगळवारी रुग्णालयात गेले होते. शिपायाला गरम पाण्यासाठी भांडे आणि फळांची गरज होती, पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला त्या सर्व वस्तू पुरवल्या आहेत. या शिवाय शिपायाच्या कुटुंबाला तातडीने एक लाख रुपयाची आर्थिक मदत पुरवण्यासाठी पोलीस मुख्यालयाला पत्र लिहिले असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.