CAA : उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचार : हेड कॉन्स्टेबलसह 7 जणांचा मृत्यू, DCP सह 50 जखमी

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) वरून उसळलेल्या हिंसाचारात एका हेड कॉन्स्टेबलसह 7 लोकांचा मृत्यू झाला आणि अर्धसैन्य आणि पोलीस दलाचे अनेक कर्मचार्‍यांसह किमान 50 लोक जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे जखमी झालेले गोकलपुरी एसीपींच्या कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल रतन लाल (42) यांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, हिंसाचारात जखमी 6 अन्य नागरिकांचा मृत्यू झाला आणि 50 जखमींवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

टायर मार्केट जाळले, घटनास्थळावर अग्निशमनच्या 6 गाड्या

भजनपुरा परिसरात जमावाने पेट्रोल पंपाला आग लावली. तर, गोकुलपुरीमध्ये कपूर पेट्रोल पंप येथील टायर मार्केट आंदोलनकर्त्यांनी जाळले. ही आग विझवण्यासाठी आग्निशमनचे 6 बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

25 फेब्रुवारीला बंद राहणार उत्तर-पूर्व जिल्ह्यातील शाळा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे की, दिल्लीत हिंसाचार सुरू असलेल्या उत्तर-पूर्व जिल्ह्यातील शाळांमधील परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी आणि प्रायव्हेट शाळा बंद राहतील. बोर्ड परीक्षेबाबत मी मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याशी चर्चा केली आहे की, उद्याची बोर्ड परीक्षासुद्धा स्थगित करण्यात यावी.

अमित शहांनी बोलावली बैठक

दिल्लीत स्थिती गंभीर झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

गृह राज्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किसन रेड्डी यांनी म्हटले की, उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसा ही अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍यादरम्यान जाणीवपूर्वक सुरू करण्यात आली आहे. मी याचा निषेध करतो. सरकार अशा प्रकारची हिंसा कधीही सहन करणार नाही. यासाठी जे दोषी आहेत, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. गृह मंत्रालय त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तेथे जादा पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. आमची मुख्य प्राथमिकता दिल्लीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणे ही आहे. गृह मंत्रालयाने त्या लोकांवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे, जे पोलीस कर्मचार्‍यांची हत्या, दगडफेक आणि संपत्तीची जाळपोळ करण्यासाठी दोषी आहेत. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी, काँग्रेस पार्टी आणि सीएएविरोधात आंदोलन करणार्‍या लोकांना सांगितले पाहिजे की, भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी कोण जबाबदार आहे?

सीआरपीएफच्या 8 कंपन्या तैनात

दिल्लीत काही ठिकाणी कायदा सुव्यस्था बिघडल्याने उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचार घडलेल्या 10 भागात कलम -144 लागू करण्यात आले आहे. या परिसरात दिल्ली पोलीस फ्लॅग मार्च करत आहेत. सीआरपीएफ सूत्रांनुसार, उत्तर-पूर्व दिल्लीत सीआरपीएफच्या 8 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या दोन कंपन्या आणि महिला सुरक्षा कर्मचार्‍यांची एक कंपनी आहे.

स्थितीवर लक्ष ठेवून आहेत CP अमूल्य पटनायक

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, गृह मंत्रालय सतत दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहे आणि स्थितीची माहिती घेत आहे. पोलीस कमिश्नर अमूल्य पटनायक नियंत्रण कक्षात उपस्थितीत आहेत आणि घटनास्थळांवर असलेल्या अधिकार्‍यांकडून सतत माहिती घेत आहेत. सीपी दिल्ली लवकरच गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतील. प्राथमिक तपासानुसार जाफराबाद आणि आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटना सुनियोजित कट असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले – शांततेत विरोध हे लोकशाहीचे प्रतिक, हिंसा अयोग्य

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, आज दिल्लीत झालेला हिंसाचार अस्वस्थ करणारा आहे. याचा निषेध केला पाहिजे. शांततेत विरोध करणे हे लोकशाहीचे प्रतिक आहे, परंतु हिंसाचार कधीही योग्य ठरू शकत नाही. मी दिल्लीतील नागरिकांना आवाहन करतो की, संयम आणि समजूतदारपणा दाखवावा.

हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यूवर केजरीवालांनी व्यक्त केले दु:ख

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल यांच्यासह उपुमख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय, पंकज गुप्ता, संजय सिंह आदींनी ट्विट करून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

जाफराबाद आणि मौजपुर परिसरात दोन घरे जाळली

उत्तर-पूर्व दिल्लीत जाफराबाद आणि मौजपुर परिसरात आंदोलनकर्त्यांनी किमान दोन घरांना आग लावली, ज्यामुळे तणाव वाढला आहे. या भागात सोमवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशी सीएए समर्थक आणि विरोधी गटांमध्ये चकमक झाल. आंदोलनकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी आश्रू धुराचे गोळे सोडले. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अधिकार्‍यांनुसार आंदोलनकर्त्यांनी परिसरात आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीचेही नुकसान केले.

जाफराबाद आणि मौजपुर-बाबरपुर मेट्रो स्टेशन बंद

दिल्ली मेट्रोने परिसरात तणाव निर्माण झाल्याने जाफराबाद आणि मौजपुर-बाबरपुर स्टेशनांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद केले. डीएमआरसीने ट्विट केले की, जाफराबाद व मौजपुर-बाबरपुर मेट्रो स्टेशनांची प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. या स्टेशनांवर ट्रेन थांबणार नाहीत. जाफराबाद मेट्रो स्टेशनचे प्रवेशद्वार मागील 24 तासांपासून बंद आहे.

सीएएविरूद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार्‍या लोकांनी रविवारी रस्ते बंद केले होते, ज्यामुळे जाफराबादमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये चकमक सुरू झाली. दिल्लीच्या अन्य भागातसुद्धा अशाच प्रकारची आंदोलने सुरू झाली आहेत.