उपजिल्हा रुग्णालयातून हाकलून दिलेली महिला खाजगी दवाखान्यात प्रसूत

हाडगा : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसूत काळातील दिवस संपून आठ दिवस झाल्याने प्रसूतीसाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून ॲडमीट होण्यासाठी खेटे मारणाऱ्या महिलेला तुम्ही आताच प्रसूती होऊ शकत नाही म्हणून चक्क हाकलून देण्यात आले. तर ही महिला काही तासांतच खाजगी रुग्णालयात प्रसूत झाली. पैसे नाहीत म्हणून सरकारी दवाखाना गाठला, परंतु तेथे झालेली त्या महिलेची हेळसांड मन सुन्न करणारी असून पुन्हा एकदा निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

निलंगा तालुक्यात हाडगा येथील अफरीन लायकपाशा शेख यांचा प्रसूती कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना डॉक्टरांनी वेळ न घालता तात्काळ शिजर करून प्रसूती करण्याचा सल्ला दिला. खाजगी दवाखान्याचा खर्च झेपत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी त्यांना दोन दिवस कोणीच दाद दिली नाही. उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना परत पाठविण्यात आले. त्यांनी महिला रोगतज्ज्ञ डॉ. बरुरे यांची भेट घेतली. त्यांनी रविवारी यायला सांगितले. शेख कुटुंबीय दवाखान्यात जाऊन डॉ. बरुरे यांना संपर्क केला असता मी निवडणुकीच्या कामात आहे असे उत्तर दिले. सोमवारी प्रसूत वेदना जास्तच होत असल्याने पुन्हा त्यांनी सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय गाठले. साडेअकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यानंतर आलेल्या डॉ. श्रीमती कटके यांनी माझा राऊंड नाही, असे उत्तर दिले.

नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांना बोलावून घडत असलेला प्रकार त्यांना सांगितला असता सौदागर यांनी भ्रमणध्वनीवरून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौंदाळे यांना संपर्क साधावा. आध्र्या तासाने डॉ. कटके यांनी पेशंटला बोलावून तुम्ही जा आणखी दहा दिवसांनी या आताच प्रसूती होत नाही म्हणून चक्क दम भरत हाकलून दिले. नाईलाजाने शेख यांनी पैशांची जुळवाजुळव करून काही धोका होईल या भीतीने खाजगी रुग्णालयात शिजर करुन प्रसूती करीत सुटकेचा नि:श्वास टाकला.