काय सांगता ! होय, उपमुख्यमंत्री अजित पवारांना अद्यापही सरकारी बंगला नाही मिळाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास १०० दिवस उलटले तरीही अजून गेल्या सरकारमधल्या मंत्र्यांनी आपले बंगले सोडलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की सरकार येऊन तब्बल १०० दिवस झाले असले तरी आमच्या भावाला अजून बंगला मिळतच नाही. जे आम्हाला तत्वज्ञान शिकवत असतात त्यांनीच बंगले सोडले नाहीत असा खोचक टोला सुळेंनी भाजपला लगावला आहे.

सुप्रिया सुळे या रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात बोलत होत्या. सुळे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना मंत्रालयात भेटणं अशक्य आहे. विशेष म्हणजे दरवाजे उघडणाऱ्यांच्या आधीच दादा तेथे पोहोचलेले असतात. त्याचं कारण म्हणजे, आमच्या भावाला अजूनही बंगलाच मिळाला नाही. सरकार येऊन १०० दिवस उलटले तरीही ‘दादा’ला घर मिळालं नाही. आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे बंगले सोडायलाच तयार नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली.

मलबार हिल येथील देवगिरी बंगला हा भाजप सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राहण्यासाठी देण्यात आला होता. मात्र नवीन सरकार येऊन १०० दिवस झाले तरीही मुनगंटीवार अजून बंगला सोडायला काही तयार नाहीत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सध्या चर्चगेटच्या एका इमारतीत राहावे लागत आहे.