‘दिवसाला 6 तास काम आणि 4 दिवसांचा आठवडा भारतातही लागू करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिनलँडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सना मरीन यांनी एक विधेयक सादर केलं आहे. यात देशातील कर्मचाऱ्यांना आता दररोज केवळ 6 तास काम करावं लागणार आहे. याशिवाय त्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे असा उल्लेख केला आहे. लवकरच प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र हीच चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निर्णयाचा अभ्यास करावा असा सल्ला देत मोदींना टॅग केलं आहे. अशा प्रकारचा निर्णय भारतातही लागू करावा असे मोदींना सुचवले आहे. याशिवाय काहींनी फिनलँडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सोशलवर या निर्णयाला घेऊन जोरदार चर्चा सुरू आहे. सना मरीन या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत.

पदभार स्विकारल्यानंतर सना मरीन यांनी देशातील कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव मांडला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कर्मचारी आता कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकतील असं मरीन यांचं मत आहे. याशिवाय देशतील सर्वच कंपन्यांनी कामाच्या वेळा कमी कराव्यात असा माझा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

का घेतला हा निर्णय ?

सोशल डेमोक्रॅटीक पार्टीच्या(SDP) 120 व्या वर्धापनदिनानिमित्त या नवीन वेळापत्रकाची चाचपणी करण्याचे आदेश मरीन यांनी दिले आहेत. सना मरीन म्हणतात, “देशातील कामगार वर्गाने कामामध्ये किती तास घालवावेत याबद्दल मला चिंता आहे. हा निर्णय म्हणजे महिलेच्या दृष्टीकोनातून देश चालवण्याचा प्रयत्न आहे असं समजू नये. हा निर्णय देशातील कामगार वर्गाचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/