देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना केला ‘कॉल’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप सत्तेत असूनही पंकजा मुंडे यांना विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असून त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र त्यानंतर आता भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या मनधरणीचे प्रयत्न करायला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट करत मला तुमच्याशी बोलायचे आहे पुढील वाटचालीसाठी वेगळा मार्ग काय घ्यायचा याबाबत निर्णय करायचा आहे यासाठी सर्वांनी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर या असे आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे आता या दिवशी पंकजा नेमका काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पंकजा मुंडे या पराभवामुळे पक्षावर नाराज आहेत असे वारंवार बोलले जात होते. त्यातच सर्वात जास्त जागा येऊन देखील भाजपला विरोधी पक्षाच्या बाकावर बसायला लागले आहे. त्यामुळे भाजपला पंकजा मुंडे यांची नाराजी परवडणारी नाही त्यामुळे यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करताहेत.

पंकजा मुंडे या पराभवासाठी काही आपल्याच नेत्यांना जबाबदार ठरवत आहेत. त्यांची नाराजी ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. या वेळी दोघांमध्ये राजकीय गोष्टींवर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

भाजपचे विनोद तावडे, बबनराव लोणीकर, राम शिंदे यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. सध्या भाजपला कोणतेही बंड परवडणारे नाही त्यामुळे भाजपकडून पंकजा यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे कि काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. पंकजा मुंडे यांनी मात्र अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे १२ डिसेंबरला पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com