पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड तपास करत आहेत. मात्र, पूजा हिच्या कुटुंबीयांनी तक्रार दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे.

तीन दिवसांपूर्वी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या आत्महत्या प्रकरणात सत्ताधारी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव भाजपकडून घेण्यात आले आहे. तर काही रेकॉर्डिंग बाहेर आले आहे. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र पोलिसांना अद्याप तरी पूजाच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

पूजा ही काही दिवसांपूर्वीच स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी पुण्यात आली होती. पूजा, तिचा चुलत भाऊ व एक मित्र हेवन पार्क परिसरातील सदनिकेत राहत होते. रविवारी (७ फेब्रुवारी) मध्यरात्री तिने सदनिकेतील बाल्कनीतून उडी मारली. याप्रकरणात तिचा चुलतभाऊ व मित्राचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे पत्र पोलीस महासंचालकांना दिले आहे. तर, याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा,अशी थेट मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.