3 महत्त्वाच्या खात्यांवरून ‘महाविकास’आघाडीत तीव्र मतभेद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला मंत्रीमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्तास्थापनेचा नवीन प्रयोग करण्यात आला. मात्र या आघाडीत मंत्रीपदावरून अद्याप एकमत झाले नाही. सरकारमधील तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. खातेवाटपात समाधानकारक खाती न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सर्वच नेत्यांकडून मंत्रीपदासाठी फिल्डींग लावण्यात येत आहे. यात कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील. मात्र सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या तीन महत्वाच्या खात्यांवर मतभेद निर्माण झालेले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या तिन्ही पक्षातील खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

Visit : policenama.com