दिशा कायदा नागपूर अधिवेशनात होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मंगळवारी झालेल्या बैठकीत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासाठी दिशा कायद्यासंबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या आगामी नागपूर अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. अनिल देशमुख यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्या संदर्भातील उपाययोजनांसंदर्भात विविध पक्षसंघटनांच्या महिला नेत्यांची बैठक घेतली.

दिशा कायदा व्हावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारकडूनच पुढाकार घेण्यात आला होता त्यासाठी मी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हैदराबादला गेलो होतो. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याचे सादरीकरण मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची एक उपसमिती सुद्धा नेमण्यात आली होती.कोरोनामुळे या संदर्भातील कार्यवाही होऊ शकली नाही.मात्र, आगामी नागपूर अधिवेशनात या कायद्याचे विधेयक मांडण्यात येईल आणि ते मंजूर करण्यावर सरकारचा प्रयत्न असेल व त्याला सर्वपक्षीय पाठिंबा नक्कीच राहील, असे अनिल देशमुख यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आ.मनिषा कायंदे, आ.यामिनी जाधव, मीना कांबळी, सरोज राव, नीला लिमये, ज्योती ठाकरे, रूपाली चाकणकर यांच्याकडून विविध सूचना करण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थितीत होते.