‘कोरोनामुळं यंदा धम्मचक्रप्रवर्तन दिनी दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नका’ : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाचा संसर्ग पाहता यंदा धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नका असं आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जसे आपण सण साजरे केले त्याप्रमाणे या दोन दिवशीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा असंही आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवले म्हणाले, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबरला दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. यंदा कोरोना संकट आणि या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, गर्दी करू नये. चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन देण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत” असंही आठवले यांनी सांगितलं आहे.

दादर येथील इंदू मिल या ठिकाणी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत मी आज एमएमआरडी, शापूरजी पालनजी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 36 आठवड्यांमध्ये स्मारकाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शिल्पकार राम सुतार यांच्यासोबतही माझी चर्चा झआली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवण्याबाबत संमती दर्शवली आहे असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.