फेसबुकवर ब्राह्मणविरोधी पोस्ट, डॉक्टरला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवर हिंदू धर्म आणि ब्राह्मणांविरोधात पोस्ट टाकणाऱ्या विक्रोळीतील डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. पार्कसाईट पोलिसांनी विक्रोळीतील डॉ. सुनीलकुमार निशाद याला अटक केली असून निशाद याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधातील पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी रविंद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्कसाईट पोलिसांकडे तक्रार केली आहे. डॉ. सुनीलकुमार निशाद हा होमिओपॅथी डॉक्टर आहे.

फिर्य़ादी आणि डॉ. निशाद हे एकाच परिसरात राहणारे आहेत. मागील दोन वर्षापासून निशाद सातत्याने फेसबुकवर ब्राह्मणविरोधी आणि हिंदू धर्माच्या विरोधात पोस्ट टाकत होता. त्याला अनेकवेळा समजावून सांगितले मात्र तो ऐकत नव्हता. त्याला अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नकोस जर एखाद्या धर्माविषयी किंवा एखाद्या व्यक्ती विषयी तक्रार असेल तर पोलिसांत तक्रार कर असेही त्याला तिवारी यांनी सांगितले होते. मात्र तो अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकत होता. निशाद याने मोदी, भाजपा आणि प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करणारी पोस्ट देखील टाकली आहे.

रविंद्र तिवारी यांनी शनिवारी निशादच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी डॉ. निशादला बुधवारी अटक केली. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळून अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. निशाद हा होमिओपॅथी डॉक्टर असून अटक पूर्व जामीनाचा अर्ज देण्यासाठी न्यायालयात जात असतानाच पोलिसांनी निशादला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like