डोनाल्ड ट्रम्प हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार : नोम चॉम्स्की

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेत देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून याठिकाणी हजारो लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील हजारो लोकांच्या मृत्यूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जबाबदार असल्याचे प्रख्यात समाजशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की यांनी म्हटले आहे.

ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चॉम्स्की यांनी हा आरोप केला आहे. चॉम्स्की पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा फायदा आणि व्यावसायिकांचा खिसा भरण्यासाठी अमेरिकन लोकांचा जीव धोक्यात घातला असल्याचा आरोप चॉम्स्की यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, या दशकाच्या सर्वात मोठ्या आरोग्याच्या संकटादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देशाचे रक्षक असल्याचे नाटक करत सामान्य अमेरिकन लोकांच्या पाठीवर वार करीत आहेत.

मुलाखतीमध्ये चॉम्स्की म्हणाले की, अमेरिकेचे पुन्हा अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीमंत उद्योजकांच्या हितासाठी आरोग्यसेवा आणि संसर्गजन्य रोग संशोधनाचा खर्च कमी करण्यासारखे पाऊल उचलले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात प्रत्येक वर्षी संस्थांच्या निधीत कपात करण्याचे काम करत आहेत. सरकारी निधीत कपात सुरु आहे. लोकांना धोक्यात आणले जा आहे. मात्र, श्रीमंत आणि व्यावसायिकांचा फायदा वाढवला जात आहे, असे चॉम्स्की यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करताना चॉम्स्की यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यांच्या राज्यपालांवर कोरोनाविरोधात लढण्याची जबाबदारी सोपवली आणि आपल्या कार्यकर्त्याकडे पाठ फिरवली. सर्व लोकांना जिवे मारण्याची आणि निवडणूक राजकारण सुधारण्याची ही त्यांची रणनिती आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

अमेरिकेतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला चॉम्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवताना सांगितले की, फक्त अमेरिकेतील नाही तर संपूर्ण जगातील लोकांच्या मृत्यूला डोनाल्ड ट्रम्प जबादार आहेत. अमेरिकन लोकांविरोधातील आपला गुन्हा लपवण्यासाठी ते कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याच्या निर्णयामुळे येमेन आणि आफ्रिकन खंडातील मृत्यूंमध्ये वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.