‘कोणाला काहीही बोलू द्या, मी खासदार होणारच’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही स्पष्ट बोलतो आणि समाजाच्या हक्कासाठी लढतो, हे अनेकांना माहिती आहे. आम्ही जर कोणत्या सत्तेवर आलो तर त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल, हे जाणून असल्याने काहीजण आम्हाला विरोध करत आहेत. कोणी काही बोलू उद्या मी खासदार होणारच असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले.

गणेगाव येथे झालेल्या बैठकीस माजी सरपंच अमोल भनगडे, बबनराव कोळसे, सुदाम वाणी, साहेबराव कोबरणे, पोपट कोबरणे, गोरक्षनाथ कोबरणे, बाबासाहेब कोबरणे, आदींसह नागरिक उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, निळवंडे कालव्यांच्या बाबतीत मोठे राजकारण केले जात असल्याने आजपर्यंत या निळवंडे कालव्यांची कामे सुरू झालेली नाहीत. याबाबत आम्ही सखोल अभ्यास केला. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी संस्थानकडून कालव्याच्या कामासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. शासनानेही 100 कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. मात्र, हा निधी घेऊन धरणाच्या सुरूवातीपासून हेडपासूनच काम सुरु करावे आणि सुरूवातीच्या 13 किमी. अंतराच्या कालव्यांसाठी सुरूवातीच्या निधीचा वापर करावा, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा – नायब तहसीलदारांच्या पथकाला चिरडण्याचा प्रयत्न 

कालव्यांच्या टेलकडून काम सुरू केले तर आम्ही ते होऊ देणार नाही. कोपरगाव, राहुरी, राहाता या भागातील सर्व नेत्यांनी एकत्रित टेलकडून सुरू होणार्‍या कामांना विरोध केला पाहिजे. आम्ही त्यासाठी या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. हा वादाचा मुद्दा नाही. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आता आपल्याला लढावे लागणार आहे. संघर्षातून आपल्याला आपला हक्क घ्यावा लागेल. जनआक्रोश समोर आणण्यासाठी जनआंदोलनाची गरज आहे आणि ते जनआंदोलन आम्ही उभारणार आहोत, असेही ते म्हणाले.

अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच : जयंत पाटील

अहमदनगर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला सोडलेली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अकलूज येथे पत्रकारांनी शरद पवार यांना अहमदनगर लोकसभेच्या जागेसंदर्भात विचारले होते. त्यावर शरद पवार यांनी उत्‍तर देखील दिले. मात्र, शरद पवार यांनी दिलेले उत्‍तर तेथील आवाजामुळे पत्रकारांना व्यवस्थित ऐकु आले नाही. त्यामुळे हा गोंधळ उडाला असे सांगण्यात येत आहे.

अहमदनगर लोकसभेची जागा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडण्यात आल्याचे वृत्‍त वार्‍यासारखे पसरले होते. मात्र, आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडली नसल्याचे सांगितले आहे.