मद्यधुंद पोलिसांची तरुणाला दगड-विटांनी मारहाण; तरुण गंभीर जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन
तरुणाने पोलिसांना मोबाईल खाली पडल्याचे सांगितल्याच्या रागातून पोलिसांनी तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. पोलिसांच्या तावडीतून सुटून तरुण पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला विटा-दगडांनी मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे तरुण बेशुद्ध पडला.

त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार रविवारी (दि. ६) रात्री आकराच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर येथील पादचारी उड्डाण पुलाजवळ घडला. मार्शल मुकुंद गर्दे (वय 25, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र सीपीआरमध्ये आल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करुन चिडलेल्या नातेवाईकांना नियंत्रणात आणले. मार्शल गर्दे यांच्या नातेवाईकाच्या घरी रविवारी नामकरणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर ते मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर गर्दे आणि त्यांचे मित्र हॉटेलबाहेर आले. गर्दे हे लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्याकडेला गेले. त्यावेळी त्या ठिकाणी साध्या वेषात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचा-याचा मोबाईल खाली पडलेला गर्दे यांना दिसला. त्यांनी साहेब तुमचा मोबाईल खाली पडला असे सांगितले.

पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत तू आम्हाला सांगणारा कोण असे म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. गर्दे यांनी पोलिसांची माफी मागून फक्त तुमचा मोबाईल पडल्याचे सांगितले. चिडलेल्या पोलिसाने गर्दे यांच्या कानाखाली मारली. पोलिसांकडून अचानक मारहाण झाल्यामुळे गर्दे आणि त्यांचे मित्र भांबावले. त्यांनी पोलिसांना याचा जाब विचारला. यामुळे चिडलेल्या पोलिसांनी गर्दे यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तावडीतून सुटका करुन ते पळून जात होते. मद्यधुंद पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन दगड आणि विटा फेकून मारल्या. यामध्ये गर्दे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलीस इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्यांना पुन्हा मारहाण केली. यामुळे गर्दे खाली पडले. ते खाली पडल्याचे दिसताच मद्यधुंद पोलीस घटनास्थळावरुन पसार झाले.

गर्दे यांना त्यांच्या मित्रांनी बेशुद्ध अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईक, मित्रांना सजताच सर्वांनी रुग्णालयात आले. मोठ्या प्रामाणात लोक जमा झाल्याने सिपीआरमध्ये गोंधळाची परिस्थीती निर्माण होऊन तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा मागवून आक्रमक झालेल्या नातेवाकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतू चिडलेल्या नातेवाईकांनी त्या पोलीस कर्मचा-यांना अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक आदींसह अधिकारी, कर्मचारीसीपीआरमध्ये दाखल झाला. डॉ.अमृतकर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रथम पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी नातेवाईकांनी केली.