पोलीस चौकशीच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

येळ्ळूर (बेळगाव) : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस चौकशीच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना बेळगावातील येळ्ळूर येथे घडली. दिगंबर मुचंडी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. येळ्ळूर येथील एका बेकरीत चोरीची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी बेकरीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक मुलगा चोरी करताना आढळला. सीसीटीव्हीतील चेहरा दिगंबर याच्या चेहऱ्याशी मिळताजुळता असल्याने खात्री करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले. मात्र, तो शाळेत गेल्याने तो भेटला नाही. पोलीस आपल्या घरी येऊन गेल्याचे समजताच घाबरलेल्या दिगंबरने गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

येळ्ळूरातील गणपती स्वीटमार्टमध्ये चोरी झाली होती. वडगावच्या पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक युवक बेकरीवरील कौले काढून आत उतरताना दिसला. गल्ल्यातील रोकड, चॉकलेट्स एकत्रित करून पुन्हा तो आल्या वाटेने निघून गेला. त्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसला. उपनिरीक्षक कृष्णवेणी यांनी हा युवक गावातीलच आहे की बाहेरील याची खात्री करून घेण्यासाठी काहींना हे सीसीटीव्ही फुटेज दाखवले. यावेळी सदर युवकाचा चेहरा दिगंबरच्या चेहर्‍याशी मिळता जुळता दिसला.

पोलीस घरी येऊन गेल्याची माहिती दिगंबर याला मिळाली. पोलिसांकडून आपली चौकशी होणार या भितीने त्याने आत्महत्या केली. अशा घटनांमध्ये पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येते. मात्र, या प्रकरणात गुप्तता पाळली नाही. पोलिसांनी गुप्तता पाळली असती तर दिगंबरचा जीव वाचला असता. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.