UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात FIR दाखल करा : CM भूपेश बघेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. बघेल यांनी यावेळी योगी यांच्यावर भडकावू भाषण देण्याचा आरोप केला आहे. तसेच यावेळी त्यांनी योगी यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

दुर्ग या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना भूपेश बघेल म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अनुराग सिंह भडकावू भाषण देऊन देशात अराजक पसरवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल केला गेला पाहिजे. शाहीन बागेत गोळ्या चालवणारे त्यांचेच समर्थक आहेत. एका पुण्यतिथीच्या कार्यक्रमादरम्यान बघेल यांनी बोलताना हे वक्तव्य केले.

बजेटबाबत देखील केले भाष्य –
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रीय बजेट बाबत देखील वक्तव्य केले. ते म्हणाले, अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपलेच रेकॉर्ड मोडले बजेट एवढे मोठे असून देखील त्यामध्ये कोणत्याच वर्गासाठी काहीच नव्हते. बजेट निराशाजनक आणि महागाई वाढवणारे होते यामुळे रोजगार कमी होणार असल्याचे देखील बघेल यांनी यावेळी सांगितले. एकंदरीतच या बजेटमधून बेरोजगारांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काहीच मिळाले नसल्याची टीका यावेळी बघेल यांनी केली.